प्रभात वृत्तसेवा शिरूर – गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना शिरूर नगरपरिषदेकडून गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटणे, नदीकिनाऱ्यावरील घाटांची स्वच्छता, प्रकाशव्यवस्था आणि कृत्रिम विसर्जन तलाव तयार करणे, अशा सर्व कामांची पूर्तता झाल्याची माहिती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी दिली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शनिमंदिर विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट आणि रयत शाळेच्या मैदानावर कृत्रिम हौद (कुंभ) तयार करण्यात आले आहेत. पूजाविधीतून तयार होणारे निर्माल्य थेट नदीपात्रात जाऊ नये म्हणून स्वतंत्र निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले आहेत.पाचव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशी होणाऱ्या मोठ्या विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी नगरपरिषदेकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक आणि गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र योजना आखण्यात आली असून, सुरक्षित व सुरळीत विसर्जनासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात आली आहे.यावर्षी नगरपरिषदेच्यावतीने गणेशमूर्ती संकलन उपक्रम राबविण्यात येणार असून यात सहभागी होणाऱ्या भाविकांना “पर्यावरण दूत” प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. मूर्ती कृत्रिम हौदात किंवा संकलन केंद्रात विसर्जित केल्यास पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, विसर्जनासाठी कृत्रिम हौद अथवा मूर्ती संकलन उपक्रमाचा उपयोग करावा. निर्माल्य नदीत न टाकता फक्त उपलब्ध कलशातच टाकावे. सध्या नदीतील पाण्याची पातळी वाढलेली असल्याने विसर्जनावेळी विशेष काळजी घ्यावी. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नयेत यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.