Shirur News : शिरूर नगरपरिषद पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण; तक्रारदार आणि स्वच्छता निरीक्षकांच्याच सखोल चौकशीची मागणी!
शिरूर नगरपरिषदेतील (Shirur News) कथित पाईप चोरी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात केवळ चोरीचा तपास न करता फिर्यादी आणि नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Shirur News : शिरूर नगरपरिषदेतील (Shirur News) कथित पाईप चोरी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात केवळ चोरीचा तपास न करता फिर्यादी आणि नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिरूर नगरपरिषद (Shirur News) हद्दीतील मुख्य जलवाहिनी तसेच बंद करण्यात आलेल्या पाईपलाईनमधील जुने पाईप चोरीला गेल्याची लेखी तक्रार नगरपरिषद प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे. मात्र, हा प्रकार संशयास्पद असून, नगरपरिषदेतील काही अधिकारी संगनमताने अनेक वर्षांपासून भंगार साहित्याची विक्री करत आहेत. विक्री स्वतःच करायची आणि नंतर चोरी झाल्याचा बनाव करून पोलीस व जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात २०२२ आणि २०२६ मधील दोन गुन्ह्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. २४ जून २०२२ रोजी सेंटर शाळेतील बंद खोलीतील भंगार चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक ४५९/२०२२ दाखल झाला होता. त्याच काळात सेंटर शाळेच्या मोकळ्या जागेतील सुमारे ४० लाख रुपयांच्या भंगार विक्री घोटाळ्याप्रकरणी सततच्या पाठपुराव्यानंतर १४ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ०३९/२०२६ दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणांमागे नगरपरिषदेचे (Shirur News) स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या पाईप चोरी प्रकरणासह यापूर्वी दाखल झालेले दोन्ही गुन्हे, संबंधित तक्रारी आणि संपूर्ण भंगार व्यवहार यांची एकत्रित चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, पाईप चोरी प्रकरणातील फिर्यादी आणि स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची समोरासमोर कसून चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. या चौकशीत आवश्यक ती सर्व माहिती व सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल आणि कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षक फुलारी यांनाही यापूर्वी निवेदन देऊन संबंधित व्यक्तींची नावे व अन्य माहिती सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रारदारांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि सर्वंकष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिरूर पोलिसांकडे केली आहे.






