Shirur News : शिकण्याला वयाचं बंधन नसतं..; ६१ व्या वर्षी बाबुराव पाचंगे बनले ‘वकील’

शिरूर : शिरूर तालुक्यातील शक्ती प्रिंटर्सचे मालक, तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख बाबुराव पाचंगे यांनी आपल्या जीवनप्रवासात एक नवा अध्याय जोडला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी एल.एल.बी. (वकीली)ची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत त्यांनी “वय म्हणजे केवळ एक आकडा असतो” हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या या यशामुळे शिरूर परिसरात आणि तालुकाभरातुन त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
बाबुराव यांचा जीवनप्रवास हा संघर्षांनी भरलेला असला तरी त्यांनी कधीही हार मानली नाही. आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्य सांभाळून त्यांनी शिक्षणाची धग मनात जागवली आणि चिकाटीने एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं, तर “शिकण्याला वयाचं बंधन नसतं. प्रयत्नात सातत्य असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”
विशेष म्हणजे, बाबुराव यांचा ६१ वा वाढदिवस साजरा होत असतानाच एल.एल.बी.चा निकाल जाहीर झाला आणि त्यात त्यांनी उत्तम यश संपादन केलं. त्यामुळे हा दिवस त्यांच्या आयुष्यात दुहेरी आनंदाचा ठरला आहे.
या यशानंतर प्रतिक्रिया देताना बाबुराव यांनी स्पष्टपणे सांगितलं, “मी माझ्या वकिलीच्या माध्यमातून समाजातील गरजू, गरीब आणि वंचित घटकांसाठी विनामूल्य सेवा देणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदतीसाठी मी नेहमी उपलब्ध राहणार आहे.” असं त्यांनी म्हंटलं आहे.





