Shirur News : ‘अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक तातडीने बसवा’; शिरूर परिसरातील नागरीकांची मागणी

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पुणे-अहिल्यानगर मार्गावर विशेषतः नवीन प्रशासकीय इमारत व शिरूर पोलिस ठाण्यासमोरील चौकात, वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब समोर आली आहे. सदर मार्गावर अपघाताची संभाव्यता लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक व सिग्नल यंत्रणा बसविण्याची जोरदार मागणी नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात निलेश वाळुंज या सामाजिक कार्यकर्त्याकडून केलेल्या लेखी मागणीनुसार तहसीलदार शिरूर यांच्याकडून शिरूर नगरपरिषदेकडे पत्र पाठवण्यात आले आहे. परंतु शिरूर नगरपरिषदेकडून अद्याप काम सुरू करण्यात आले नाही.
पुणे-अहिल्यानगर मार्ग हा शिरूर शहराचा प्रमुख मार्ग असून, या मार्गावर नवीन प्रशासकीय इमारत, शिरूर पोलीस ठाणे, पंचायत समिती, विविध महसूल व शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. विद्यार्थ्यांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत, तसेच शासकीय कर्मचारी यांना हा चौक ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो.
याच ठिकाणी काही अपघातही पूर्वी घडलेले असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चौकात सिग्नल यंत्रणा नाही, स्पीड कंट्रोलसाठी कोणतेही स्पीड ब्रेकर नाहीत आणि दिशादर्शक फलकांचीही कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, शिरूर नगरपरिषदेकडून त्वरीत पुढील उपाययोजना राबवून स्पीड ब्रेकर बसवणे, दिशादर्शक फलक लावणे, वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, यावर तातडीने कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने हाताळावा, अशी एकमुखी मागणी होत असून, प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनी याबाबत तक्रार किंवा लेखी पत्र दिल्यानंतरच काम सुरू होणार का? तोपर्यंत हे प्रशासन काय करतय. अजून किती लोकांचा बळी या रस्त्यावर शिरूर नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे होणार असा प्रश्न शिरूर तालुक्यातील सजग नागरिक विचारत आहे.





