प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मंत्रालय दालनात तालुक्यातील सरपंच, ग्रामस्थ आणि स्थानिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबांना मदत आणि बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. या प्रतिनिधीमंडळात शिरूर तालुक्यातील फाकटे, वडनेर खुर्द, पिंपरखेड, टाकळी हाजी, म्हसे यासह आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव, देवगाव, पारगाव तर्फे अवसरी आदी गावांतील ग्रामस्थ व शिवबा संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.या शिष्टमंडळाने बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त यंत्रणा उभी करावी, मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना योग्य नुकसानभरपाई व शासकीय मदत तातडीने देण्यात यावी, तसेच गावागावांत पिंजरे, प्रकाशयोजना आणि वनपथकांची गस्त वाढविणे यांसारख्या ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली. वनमंत्री गणेश नाईक यांनी सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून तातडीने अधिकाऱ्यांना शिरूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. “लवकरच सर्व सरपंच, ग्रामस्थ व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करून ठोस निर्णय घेतला जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे फाकटे येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर उर्फ नितीन पिंगळे यांनी सांगितले. या भेटीचे आयोजन अजय चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.