शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन स्वतंत्र चोरीच्या घटनांतील आरोपींना अटक करून ४,६८,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. २४ जून २०२५ रोजी मा. न्यायालयाच्या आदेशानुसार हे दागिने मूळ मालकांना परत करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे शिरूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पहिली घटना: बसस्थानक परिसरातील चोरी ११ मे २०२५ रोजी रूपाली अनिल काळे (वय ४०, रा. त्रिमूर्ती नगर, बारामती) यांचे ६.१ तोळ्यांचे, ३,९०,००० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण शिरूर बसस्थानक परिसरातून चोरीस गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी मनिषा विजय कसबे आणि शोभा शंकर दामोदर (दोघी रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली. गुन्हा रजि. नं. ३१७/२०२५ अंतर्गत कारवाई करून चोरीस गेलेले गंठण जप्त करण्यात आले. दुसरी घटना: वृद्ध महिलेची फसवणूक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी छबुबाई नारायण बनसोडे (रा. पाचर्णेमळा, शिरूर) यांचे ७८,००० रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र आणि सोन्याचे कानातील फुल चोरीस गेले. आरोपींनी वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून दिशाभूल केली होती. गुजरात आणि नागपूर येथील पाच आरोपी हरी गंगाराम बावरी राठोड, सुरज व राहुल हसमुखभाई राजपूत, गौरांग चंद्रकांत पटेल आणि बबलु बिरवंद सोलंकी यांना अटक करण्यात आली. गुन्हा रजि. नं. ९६५/२०२४, भा.दं.वि. कलम ३१८(४), ३(५) अंतर्गत कारवाई झाली. मूळ मालकांना मुद्देमाल परत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते जप्त केलेला मुद्देमाल मूळ फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला. या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि पोलीस हवालदार बापु मांगडे यांचे मोलाचे योगदान राहिले. या यशामुळे नागरिकांत पोलीस दलाविषयी विश्वास वृद्धिंगत झाला असून, फिर्यादी आणि स्थानिकांनी शिरूर पोलिसांचे आभार मानले आहेत.