Shirur News | बैलपोळ्याच्या मिरवणुकीत गोंधळ! डीजेच्या आवाजाने बैल बिथरले ; दोन लहान मुलांना तुडवलं

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे बैलपोळ्याच्या मिरवणुकीत डीजेचा मोठा आवाज झाल्याने दोन बैल बिथरले. त्यांच्याखाली येऊन दोन लहान मुले जखमी झाली असून, या घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी डीजे मालक आणि मिरवणुकीच्या आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे.पिंपळे जगताप येथे उद्योजक स्वप्नील शेळके यांनी बैलांची मिरवणूक आयोजित केली होती. यावेळी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता डीजे लावून मिरवणूक सुरू असताना डीजेच्या आवाजामुळे दोन बैल अचानक सैरावैरा पळू लागले.
या बैलांनी काही वाहनांना धडक दिली आणि गर्दीमध्ये शिरले. याचवेळी आपल्या कुटुंबियांसोबत आलेल्या दोन लहान मुलांना या बिथरलेल्या बैलांनी तुडवले, यात ती मुले किरकोळ जखमी झाली.घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान, मिरवणूक विनापरवाना डीजे लावून काढल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस हवालदार कृष्णा सूर्यभान व्यवहारे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी डीजे मालक गणेश मोहन भोंडवे (वय ४३, रा. वाजेवाडी, ता. शिरूर) आणि मिरवणूक आयोजक स्वप्नील शांताराम शेळके (वय ३४, रा. पिंपळे जगताप) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप बनकर करत आहेत.





