Shirur News : पिंपरखेडमध्ये प्रशासनाचा ‘बुलडोझर’! शासकीय जागेवरील व्यावसायिक अतिक्रमणे जमीनदोस्त
Shirur News : ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई; मुदत संपल्यानंतरही अतिक्रमणे न काढल्याने प्रशासनाचा आक्रमक पवित्रा.

Shirur News – पिंपरखेड (ता. शिरूर) येथील गायरान गट नंबर ३५८/१ अ मधील शासकीय जागेवर करण्यात आलेली अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणे ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस बंदोबस्तात शुक्रवार (दि.२०) रोजी हटवण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कारवाई अखेर पार पडली.
या कारवाईमुळे पिंपरखेड गावठाण, गायरानमधील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. पिंपरखेड ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गायरान जमिनीवर व्यावसायिकांनी विनापरवाना पत्राशेड आणि टपऱ्यांचे अतिक्रमण केले होते. यासंदर्भात ग्रामपंचायतीने संबंधितांना वारंवार नोटिसा बजावून स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे न काढल्याने अखेर प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करीत पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.कारवाई सुरू होताच काही टपरीधारक व्यावसायिकांनी याला कडाडून विरोध केला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेल्या नागरिकांना कायद्याची समज दिली.
“शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुसार काढणे बंधनकारक आहे,” असे सांगत प्रशासनाने कोणाचेही ऐकून न घेता कारवाई सुरूच ठेवल्याने अतिक्रमण धारकांनी आपले साहित्य व अतिक्रमण केलेले शेडचे मटेरियल ताब्यात घेऊन जागा मोकळी केली. मोहिमेसाठी मंडलाधिकारी राजेंद्र पोटकुले, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, ग्राममहसूल अधिकारी सुग्रीव मुंढे, ग्रामविकास अधिकारी आशिष भागवत यांच्यासह पोलीस फौजफाटा तैनात होता.
कार्यवाहीवेळी पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, रामदास ढोमे, बाळशिराम ढोमे, दामोदर दाभाडे, उपसरपंच विकास वरे, लक्ष्मण गायकवाड, बळवंत बोंबे, रामदास दरेकर, बबनराव बोंबे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ रात्री नऊ वाजेपर्यंत उपस्थित होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच रूग्नवाहिका, अग्निशमन दल , ड्रोनद्वारे चित्रीकरणासह, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





