Shirur News : शिरुर नगरपरिषदेने केले वनविभागाच्या हद्दीत बेकायदेशीर काम; मनसेची वन विभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

शिरूर : शिरुर नगरपरिषद रस्त्याच्या सामासिक अंतरामध्येच नव्हे तर रस्त्यातच गटार व पाण्याची पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने टाकून नागरीकांची दिशाभूल करत आहे तसेच वन विभागाच्या हद्दीत बेकायदेशीररित्या खोदकाम करून पाईपलाईन टाकल्याने त्याची लेखी तक्रार मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व सह्याद्री देवराई चे समन्वयक महीबूब सय्यद , शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसे शिरूर शहराध्यक्ष ॲड आदित्य मैड, शहर सचिव रवि लेंडे यांनी जिल्हाधिकारी,पुणे व वन विभाग शिरूर यांच्याकडे केली आहे.
शिरुर नगरपरिषद गेल्या एक वर्षापासून चुकीच्या पध्दतीने रस्त्याच्या सामासिक अंतरामध्ये, तर कधी रस्त्याच्या पदपथामध्ये शासन निर्णयाची पायमल्ली करुन बेकायदेशिररित्या खाजगी संस्थांना वेगवेगळया प्रकारची परवानग्या देऊन चुकीची कामे करत आहेत. त्याबाबत नगर परिषदेला वेळोवेळी कळविण्यात आले होते. शिरुर शहराची वाढती लोकसंख्या पाहता रस्त्याचे रूंदीकरण करणे (डेव्हलपमेंट प्लॅननुसार) गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करुन शिरुर नगरपरिषद रस्त्यामध्येच खाजगी संस्थांना वेगवेगळया पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी दिलेली आहे व देत आहेत.
पदपथामध्ये काही खाजगी संस्थांनी नगरपरिषदेच्या कृपाआशीर्वादाने अतिक्रमण केलेले आहे. आता तर शिरूर नगरपरिषदेने कहरच केला की, नगरपरिषद स्वतःच्या रस्त्यामध्ये गटार व पाईपलाईन टाकत आहे. शासन निर्णयानुसार रस्त्यामध्ये व रस्त्याच्या सामासिक अंतरामध्ये कोणत्याही प्रकारची सूट न देण्याचा निर्णय असताना शिरुर नगरपरिषद मागील दोन आठवडयांपासून बेकायदेशीररित्या शासनाच्या निधीचा दुरुपयोग करुन रात्रीच्या अंधारामध्ये रस्ते खोदून गटार व पाईपलाईनचे काम करत आहे. शिरुर नगरपरिषदेने वनविभागाच्या जागेत कोणतीही परवानगी न घेता खोदाई केलेली आहे.
शिरुर नगरपरिषद करत असलेल्या कामाची तात्काळ चौकशी करावी व जनतेच्या निधीचा होणारा अपव्यय आपण थांबवावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरुर नगरपरिषदेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड, व मनसेचे शहर सचिव रवि लेंडे यांनी सांगितले आहे.
हद्दी कायम करण्यात येईपर्यंत कोणतेही काम शिरूर नगर परिषदेने सदर ठिकाणी करू नये.
विकास भोसले (वनपरीक्षेत्र आधिकारी शिरूर)डीपी प्लॅन नुसार सदरचे काम चालू आहे. वनविभागाच्या हद्दीतील जागा कोणाची याची माहिती नाही .परंतु वनविभागाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे.वन विभागाने अद्याप परवानगी दिली नाही.
प्रितम पाटील (मुख्याधिकारी शिरूर)





