Newasa News : धाडसी पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवला कायद्याचा झटका; गोमांस विक्री करणाऱ्यांना अटक

नेवासा : नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना रविवार, ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरात गोमांस विक्री होत असल्याचे समजले. त्यांनी तातडीने पोलीस पथक आणि पंचांना घटनास्थळी पाठवले. मात्र, नाईकवाडी मोहल्ल्यात राहणाऱ्या एका महिलेने पोलीस पथकाला धक्काबुक्की केली, तर दुसऱ्या एका व्यक्तीने तळघरातून सिनेस्टाईलमध्ये बाहेर येत हातात सत्तुर घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतरही धाडसी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत कायदेशीर कारवाई करून दोषींना जेरबंद केले. या धाडसी कारवाईमुळे नेवासा शहरात नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी नेवासा शहरातील नाईकवाडी मोहल्ला, आयेशा मस्जिदीजवळ राहणारा आयाज लालू चौधरी याच्या घराच्या तळघरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याची खबर खाडे यांना एका गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार, त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे यांच्यासह पंच संतोष गायकवाड आणि शशिकांत चक्रनारायण यांना घटनास्थळी पाठवले. तळघरातून मांसाचा दुर्गंध येत असल्याचे लक्षात येताच पोलीस आत शिरले, तेव्हा एका महिलेने पथकाला धक्काबुक्की केली, तर दुसऱ्या व्यक्तीने सत्तुर घेऊन आक्रमकपणे आरडाओरड केली. “आमच्या तळघरात काही नाही, तुम्ही इथून निघून जा,” असे त्या महिलेने ओरडून सांगितले.
या घटनेची माहिती पाटील यांनी खाडे यांना दिल्यानंतर खाडे यांनी निरीक्षक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुमीत करंजकर, अरविंद वैद्य, श्रीनाथ गवळी आणि होमगार्ड यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कठोर कारवाई करत ३५,६०० रुपयांचा गोमांसासह मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्रात गोवंशीय जनावरांच्या कत्तलीवर बंदी असतानाही आयाज चौधरी याने जनावरांची खरेदी करून कत्तल आणि विक्री केल्याचे उघड झाले. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १३२, २७१, ३२५, ३(५) आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५(क), ९ अंतर्गत नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल डमाळे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





