Shirur Bazar Samiti: शिरूरमध्ये राजकीय खळबळ! निवडणुकीआधीच दिग्गजांचा पत्ता कट; उमेदवारांच्या आलिशान गाड्या चर्चेत
Shirur Bazar Samiti: १० गुंठे जमिनीचा ७/१२ नसणे आणि स्वाक्षरीतील चुका भोवल्या; २६७ उमेदवार रिंगणात उरल्याने आघाड्या आणि बंडखोरीच्या राजकारणाला वेग.

Shirur Bazar Samiti – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीनंतर 300 पैकी 267 अर्ज वैध ठरले असून 33 अर्ज बाद झाल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि दिग्गज नेत्यांचे अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीचे समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे ‘आर्थिक दुर्बल घटक’ मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांच्या आलिशान गाड्यांची चर्चा रंगत असल्याने या मतदारसंघाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 5 जुलै रोजी मतदान होणार आहे. यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा बाजार समिती सचिव अनिल ढोकले यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननी प्रक्रियेदरम्यान विविध उमेदवारांनी परस्परांच्या अर्जांवर हरकती घेतल्या होत्या. हरकतींची सुनावणी आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर 33 अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे अनेक इच्छुकांना निवडणुकीपूर्वीच धक्का बसला आहे.
यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग. या मतदारसंघातून अर्ज दाखल करणार्या काही उमेदवारांकडे मोठे व्यवसाय, आर्थिक सामर्थ्य आणि आलिशान जीवनशैली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे काही उमेदवार आलिशान चारचाकी वाहनांतून तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये चर्चांना उधाण आले.
‘आर्थिक दुर्बल’ या नावाच्या मतदारसंघातून आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणार्या व्यक्तींनी उमेदवारी दाखल केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 22 जून असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आघाड्या, समझोते, माघारी आणि बंडखोरीच्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
दिग्गजांचे अर्ज बाद
अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये नगरसेवक संतोष थेऊरकर, अण्णापूरचे माजी सरपंच किरण झंजाड, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन थोरात, कान्हूर सोसायटीचे माजी अध्यक्ष दीपक तळोले, तर्डोबावाडीचे माजी उपसरपंच पांडुरंग पाचर्णे यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकार्यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकार्यांच्या माहितीनुसार, दहा गुंठे जमिनीचा सातबारा नसणे, सूचक किंवा अनुमोदकाच्या नोंदीतील त्रुटी, उमेदवाराची स्वाक्षरी नसणे अथवा चुकीची असणे अशा कारणांमुळे अर्ज बाद करण्यात आले.
18 जागांसाठी 267 अर्ज शर्यतीत
छाननीनंतर सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील खुल्या जागांसाठी 118, महिला प्रवर्गासाठी 22, इतर मागास प्रवर्गासाठी 34 आणि विमुक्त जाती-जमाती प्रवर्गासाठी 16 अर्ज वैध ठरले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील खुल्या जागांसाठी 31, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 10, आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी 14, व्यापारी-आडते मतदारसंघासाठी 17 आणि हमाल-मापाडी मतदारसंघासाठी 5 अर्ज वैध ठरले आहेत.



