Meenakshi Natarajan : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द
Meenakshi Natarajan : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

Meenakshi Natarajan : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. उमेदवारी अर्जात एका प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाची माहिती न दिल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्याचे समोर आले आहे.
राज्यातील तीन राज्यसभा जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. विधानसभा संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला एक जागा सहज मिळण्याची शक्यता होती. मात्र, संभाव्य क्रॉस व्होटिंग आणि राजकीय फोडाफोडीच्या भीतीमुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना कर्नाटकात हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी विशेष विमानाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, मीनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जाविरोधात भाजपने मंगळवारी सकाळी आक्षेप नोंदविला होता. भाजपचे प्रदेश महामंत्री राहुल कोठारी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत नटराजन यांचे नाव हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या खासगी फौजदारी तक्रारीत आरोपी क्रमांक चार म्हणून नमूद असल्याचा दावा केला. ही माहिती उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेली नसल्याने अर्ज अपूर्ण असल्याचे भाजपचे म्हणणे होते.
हेही वाचा – महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
मध्य प्रदेश विधानसभेचे माजी प्रमुख सचिव अवधेश प्रताप सिंह यांनी सांगितले की, उमेदवारी रद्द झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत काँग्रेसकडे अपील करण्याची संधी उपलब्ध आहे. निवडणूक आयोग किंवा न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास परिस्थितीत बदल होऊ शकतो. अन्यथा उर्वरित तीन उमेदवार बिनविरोध राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात.
भाजपच्या तिसऱ्या उमेदवारामुळे रंगली लढत –
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय नेते तरुण चुघ, प्रदेश सरचिटणीस रजनीश अग्रवाल आणि महेश केवट यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा संख्याबळानुसार भाजप दोन जागा सहज जिंकू शकते. मात्र, तिसऱ्या जागेसाठी अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे.
२३० सदस्यीय विधानसभेत भाजपकडे १६४ आमदार आहेत. काँग्रेसची संख्या प्रभावीपणे ६२ च्या आसपास मानली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी ५८ मतांची आवश्यकता असते. त्यामुळे काँग्रेसची एक जागा निश्चित मानली जात होती. मात्र, भाजपने महेश केवट यांना तिसरे उमेदवार म्हणून मैदानात उतरवल्याने निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपने ही निवडणूक केवळ संख्याबळापुरती मर्यादित न ठेवता आमदारांची निष्ठा आणि पक्षशिस्त यांचीही कसोटी बनविली आहे. २०२० मध्ये काँग्रेसमधील २२ आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यात भाजपला यश आले होते. त्यामुळे या निवडणुकीतही फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा रंगली होती.
काँग्रेसची सावध भूमिका –
विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी पक्षाला आपल्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. मात्र, भाजपच्या कथित ‘तोडफोडीच्या राजकारणा’मुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मतदानापर्यंत सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मीनाक्षी नटराजन कोण?
मीनाक्षी नटराजन या काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणातील महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. त्या भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा राहिल्या असून काँग्रेसच्या महासचिवपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी त्यांची गणना केली जाते. स्वच्छ प्रतिमा आणि संघटनात्मक कामकाजासाठी त्या ओळखल्या जातात. मात्र, मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांचा स्वतंत्र आमदार गट नसल्याचे मानले जाते.
सामाजिक समीकरणांवर भाजपचा भर –
महेश केवट यांना उमेदवारी देऊन भाजपने केवट (मच्छीमार) समाजासह इतर मागासवर्गीय मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुढे करून व्यापक राजकीय संदेश देण्याची भाजपची रणनीती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.





