Shirur Bazar Samiti: ऐन दुष्काळात पडणार पैशाचा पाऊस? शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीत लक्ष्मीदर्शनाची चर्चा
Shirur Bazar Samiti: पाणीटंचाईमुळे शेतकरी चिंतेत असताना राजकीय वातावरण तापले; २२ जूननंतर उमेदवारीचे चित्र होणार स्पष्ट

Shirur Bazar Samiti – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असून, ऐन दुष्काळी परिस्थितीत या निवडणुकीत “पैशाचा पाऊस” पडणार का, याची चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे. संभाव्य उमेदवार, त्यांचे समर्थक आणि विविध राजकीय गटांनी मतदारांशी संपर्क वाढविला असून वैयक्तिक गाठीभेटींना विशेष महत्त्व दिले जात आहे.
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे बाजार समिती निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी, फोनद्वारे संपर्क, लहान-मोठ्या बैठका, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक ताकदीचीही चर्चा रंगू लागली आहे.
राजकीय पक्ष आणि स्थानिक गटांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली असून अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांकडे आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही गट एकत्र येण्याच्या हालचाली करत असताना काही इच्छुक स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, (दि.२२) जूननंतर उमेदवारीबाबतचे समीकरण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणता गट अंतिम युती करणार, कोण कोणासोबत राहणार आणि कोण स्वबळाचा नारा देणार याबाबत सध्या केवळ तर्कवितर्क सुरू आहेत. अनेक राजकीय नेत्यांच्या बैठका आणि चर्चांमधून पुढील रणनीती ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. बाजार समितीची निवडणूक ही केवळ संचालक मंडळ निवडीची नसून तालुक्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई मानली जात असल्याने यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार असून, २२ जूननंतरच खरी राजकीय रंगत पाहायला मिळणार आहे.
शेतकरी मरतोय, कोण विचारतोय
शिरूर तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. शेतकरी होरपळून निघत आहेत. कालव्याला आवर्तन बंद झाले आहे. ओढे, नाले आटले आहेत. पाणीटंचाईचा भीषण विळखा हा शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावणारा आहे. त्यातच शेतकरी पिके जगविण्यासाठी धडपडत आहे. मात्र, बाजार समितीच्या निवडणुकीचा आखाडा तापल्यानंतर इच्छुकांची कंबर कसली आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेली बाजार समिती नाममात्र राहिली आहे. दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी मरतोय, कोण विचारतोय, अशी दयनीय अवस्था पोशिंद्याची झाली आहे.






