Maharashtra Politics : मोठी बातमी! फुटलेले 6 खासदार शिंदे गटात जाणार नाही तर…, राजकीय वर्तुळात खळबळजनक चर्चा
Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ बंडखोर खासदारांबाबत मोठी माहिती समोर येत आहे. हे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच...

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ बंडखोर खासदारांबाबत मोठी माहिती समोर येत आहे. हे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच, आता काही चर्चांनुसार, या खासदारांची पहिली पसंती शिंदे गट नसून थेट ‘भारतीय जनता पक्ष’ (भाजप) असल्याचे समजते. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावरच या घडामोडी घडत आहेत.
आगामी निवडणुकीच्या तिकिटाची मागणी –
चर्चांनुसार, उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्धार केलेले हे ६ खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. उलट त्यांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर, भाजपमध्ये प्रवेश करताना आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला उमेदवारीचे लेखी आश्वासन द्यावे, अशी थेट मागणीही या खासदारांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लावून धरल्याची चर्चा आहे. या नव्या अटीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोटात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा – मंत्री गिरीश महाजनांचा तरूणीसोबत आक्षेपार्ह फोटो व्हायरल; सायबर पोलिसांत गुन्हा
कोणते खासदार फुटल्याचा दावा?
1. संजय जाधव (परभणी)
2. संजय देशमुख (यवतमाळ- वाशिम)
3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
मंत्रीपदावरून अंतर्गत वाद; संजय राऊतांचा खळबळजनक दावा-
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (यूबीटी) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “बंडखोर खासदारांमध्ये मंत्रीपदावरून तीव्र वाद सुरू आहेत. ६ पैकी फक्त एकालाच केंद्रात मंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, त्यांना अतिरिक्त २५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन देऊन समझोता केला जात आहे.” यापूर्वी राऊतांनी १० कोटींच्या ऑफरचा दावा केला होता, आज त्यांनी यात वाढ करत थेट २५ कोटींचा आकडा जाहीर केला आणि बंडखोरांवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली.
‘गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही!’; ‘यूबीटी’चे पोस्टर वॉर
पक्षात एवढी मोठी पडझड होत असताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मुंबईत जोरदार ‘पोस्टर वॉर’ सुरू केले आहे. अविभाजित शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा होत असतानाच, मुंबईच्या प्रमुख चौकांमध्ये आणि रस्त्यांवर मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही! असा थेट संदेश या पोस्टर्सच्या माध्यमातून देण्यात आला आहे. २०२२ मधील पक्षाचे विभाजन आणि आता ६ खासदारांचे बंड या पार्श्वभूमीवर, मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा आपला मूळ विचार कायम आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात आहे.





