Shirur Crime : “तुझा ट्रॅक्टर चोरलाय, काय करायचं ते कर”; शिरूरमध्ये पैशांच्या वादातून थेट ट्रॅक्टरच पळवला
Shirur Crime : जातेगाव बुद्रुक साखर कारखान्यासमोरील घटना; पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून मालकाचा ट्रॅक्टर पळवला.

Shirur Crime – जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील साखर कारखान्यासमोर उभा केलेला ट्रॅक्टर पैशाच्या वादातून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी युवराज माणिक राठोड याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल बाजीराव पवार हे आपला एम एच १६ बि एम ४३६२ क्रमांकाचा ट्रॅक्टर कारखान्यासमोरील एका हॉटेलजवळ लावून जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवराज राठोड तिथे आला आणि त्याने अनिल यांच्याकडे पैशांची मागणी केली. अनिल यांनी आपले सर्व पैसे आधीच दिलेले असल्याचे त्याला सांगितले.
मात्र, अनिल जेवण करून बाहेर आले असता त्यांना आपला ट्रॅक्टर जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता युवराज तिथेच रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याला ट्रॅक्टरबाबत विचारले असता, तुझा ट्रॅक्टर चोरला आहे, तुला काय करायचे ते कर, असे उद्धट उत्तर देऊन तो निघून गेला.
याप्रकरणी अनिल बाजीराव पवार (वय ३५, सध्या रा. घोलपवाडी, ता. शिरूर, मूळ रा. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी युवराज माणिक राठोड (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ट्रॅक्टरचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार अजित इंगवले पुढील तपास करत आहेत.





