Shirur Crime – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रामध्ये एकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथील काही युवक नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीमध्ये एकाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस पाटील मालन गव्हाणे, पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे, सुनील शेंडगे यांनी घटनास्थळी जाऊन पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, ही व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाची असून त्याच्या हातावर शीतल व छातीवर बदाम व त्यामध्ये शीतल असे नाव गोंदलेले असल्याचे दिसून आले. मात्र, याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. याबाबत चंद्रकांत जेजेराव पवळे (रा. सणसवाडी, ता. शिरुर, मूळ रा. कोपरा, जि. नांदेड) यांनी शिक्रापूर पोलिसांत खबर दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अजित इंगवले हे करीत आहेत.