प्रभात वृत्तसेवा पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव भिमा नदी किनारी काल रात्री शेतकऱ्यांच्या तब्बल ७० विद्युत मोटारींच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्या. यामुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.पारगाव भिमा नदीवरील पुलाच्या पूर्व बाजूच्या एकूण ८४ विद्युत मोटारी असून काल मध्यरात्री ३ च्या सुमारास तब्बल ७० विद्युत मोटारींच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्या. या वेळी चोरट्यांनी चार चाकी टेम्पोचा वापर केल्याचे जाणवले. या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांचे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱ्या मोटर चोरी व केबल चोरीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून या सराईत चोरट्यांचा व चोरीची केबल खरेदी करणाऱ्यां व्यवसायिकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. या केबल चोरी प्रकरणी शेतकरी युवराज बोत्रे यांनी केडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.