Shirur Crime: शिरूरमध्ये गुन्हेगारीचा आलेख उंचावला! ‘एमडी ड्रग्ज’, घरफोड्या अन् हप्तेबाजी; पोलिसांचा वचक संपला का?
Shirur Crime: शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी ड्रग्ज विक्री, घरफोड्या, सोनसाखळी चोरी आणि अवैध वाहतुकीत प्रचंड वाढ झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा.

– अरुणकुमार मोटे
Shirur Crime – शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही काळापासून गुन्हेगारी घटनांमध्ये सात्यत्याने वाढ होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेसह अवैध प्रवासी वाहतूक हा प्रश्न गंभीर बनला आहे. एमडीसारख्या अमली पदार्थांची कथित विक्री, विद्युत मोटारींच्या चोऱ्या, सोनसाखळी चोरी, घरफोड्या आणि दुचाकी चोरीच्या घटना, अवैध प्रवासी वाहतूक, रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग,
शाळांच्या परिसरात वाहनांची गर्दी, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर अपुरी कारवाई आणि प्रमुख चौकांमध्ये अपुरे वाहतूक नियोजन यामुळे शिरूरकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पोलिसांकडून कारवाया होत असल्या तरी दुसरीकडे गुन्हेगारीला आळा बसत नसल्याने ‘शिरूर पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे का?’ असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शिरूर शहरातील एका लॉजिंगमध्ये एमडी ड्रग्जसदृश पदार्थ आढळून आल्याची घटना नुकतीच समोर आली. त्यानंतर त्याच लॉजिंगमध्ये नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेले प्रकरणही पोलिसांत दाखल झाले. या प्रकरणात अनेक व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले असतानाच लॉजिंगच्या मालकाच्या भूमिकेबाबत अद्याप कोणती ठोस कारवाई झाली आहे का? याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करून संबंधितांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीणचे पथक शिरूरमध्ये येऊन एमडी ड्रग्ज पकडतात, धडक कारवाया करतात व शिरूर पोलिसांना या धंद्याबाबत काहीच माहीत नसते. ही लाजीरवाणी बाब आहे. मात्र, अवैध धंद्याकडून हप्ते वसुली जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
काही अमंलदार अवैध व्यवसाय करणाऱ्यांबरोबर टाकळी हाजी आऊट पोस्टमध्ये मासांहारी भोजणाची पार्टी झोडत असल्याचे समोर आले आहे. शिरूरमधील अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाबाबत अद्याप तपास लागलेला नाही. दिवसाढवळ्या अथवा वर्दळीच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नागरिकांची मागणी –
पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीचा सखोल आढावा घेऊन अमली पदार्थ विक्रेत्यांवर, चोरीच्या टोळ्यांवर आणि गुन्हेगारीला आश्रय देणाऱ्या संभाव्य घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिरूरकरांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी आता केवळ आश्वासन नव्हे, तर ठोस आणि पारदर्शक कारवाईची गरज आहे.
“शिरूर, शिक्रापूर व कारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे, विविध प्रकारची अवैध प्रवासी वाहतूक आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा कोणी प्रयत्न करत असल्यास त्यांची गय करण्यात येणार नाही. असे कोणाच्या निदर्शनास आल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. शिरूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने समन्वयाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
– रविंद्र भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर.






