शिरूर – जेष्ठ नेते शरद पवार यांनी शिरूर तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा निधी देवून शिरूर शहरासह तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकला असून शिरूर तालुक्यात पंचतारांकित औद्योगिकीकरण व चासकमानचे पाणी आणल्याने तालुक्याचे चित्र पुर्णपणे बदलले आहे. तेव्हापासून हा तालुका त्यांना मानणारा, त्यांचावर प्रेम करणारा आहे. शिवछत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराची शिदोरी व पुरोगामी विचारांची सांगड आजही शिरूर तालुक्यात रुजल्याचे दिसते. औद्योगिकीकरण, शेती क्षेत्रात झालेली क्रांती, पंचायत राज्यात महिलांना आरक्षण, तरुणांना रोजगार आदी घटकांमध्ये प्रगती झाल्याने शरद पवार यांचे विचार प्रेरणादायी आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील गाव भेट दौऱ्यात आमदार पवार बोलत होते. आमदार पवार म्हणाले, “महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुरोगामी विचारांचा वारसा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढे चालू ठेवला आहे. त्यांच्याच विचाराने खासदार डॉ. अमोल कोल्हे व मी भारावून गेलो आहोत. त्यामुळे पक्षाची पडझड होऊनही नवीन पक्ष उभारणीसाठी आम्ही शरद पवार यांच्याबरोबर एकनिष्ठ राहिलो आहोत. शिरूर-हवेली मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करत असताना मी जनतेशी असलेली नाळ कधीही तोडली नाही. नेहमीच विकासात्मक कामाला प्राधान्य देवून मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे करून आपला ठसा जनतेसमोर उमटवला आहे.” अनेक रुग्णांची मोठ्या दवाखान्यातील कोट्यवधी रुपयांची बिले माफ करण्यास भाग पाडले. ग्रामीण भागात वाड्या-वस्तीवर रस्त्यांसाठी व इतर कामांसाठी मुबलक निधी दिला आहे. शिरूर शहरात न्यायालयाची इमारत, पंचायत समिती, पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आदींच्या सुसज्ज इमारती करण्यास मोठा हातभार लावला आहे. भीमा नदीकाठच्या गावांना ‘आरओ’चे पाणी देण्याची संकल्पना माझीच आहे. एसटी बस स्थानक, व्यापारी संकुल, नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी, तसेच गेल्या पंचवार्षिकमध्ये विधिमंडळात वाघोलीसह शिरूर-हवेलीतील शेतीसह विविध प्रश्नांना वाचा फोडून अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करणार असल्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विभागणी झाल्यानंतर काही पदाधिकारी दुसरीकडे गेले असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्ता व जनता माझ्याबरोबर आहे. प्रतिस्पर्ध्यांना माझ्या कामानेच मी व कार्यकर्त्यांनी उत्तर दिले, असेही आमदार पवार म्हणाले.