शिर्डीत मंदिर पाडण्याची अफवा; पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता

शिर्डी – शिर्डीतील अनेक ग्रुपवर बुधवारी श्रीरामनगर येथील तुळजाभवानी मातेचं मंदिर शिर्डी नगरपरिषद प्रशासनाद्वारे पाडले जाणार असल्याची पोस्ट व्हायरल झाल्याने गुरुवारी शिर्डीतील श्रीरामनगर येथील शेकडो कार्यकर्ते या प्रकरणाविषयी कारवाईसाठी थेट पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन गेले. मात्र, हा मॅसेज संपूर्ण खोटा असून, कोणीही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सविस्तरपणे माहिती देत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले तेव्हा कुठे सर्व वातावरण शांत झाले.
मात्र, अफवेचा हा खोटा मॅसेज सर्व ठिकाणी व्हायरल झाल्याने शिर्डीतील परिस्थिती तणावाची असली, तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे तणावपूर्ण शांतता पसरली आहे. शिर्डीतील श्रीरामनगर उपनगरात गेल्या 20-25 वर्षांपासून तुळजाभवानी मातेचे मंदिर असून, त्याठिकाणी दररोज विधिवत पूजाअर्चा होत असते व अनेक श्रद्धाळू तेथे दर्शनासाठी जातात. मात्र, मंदिरासमोर कुठलीही परवानगी न घेता बेकायदा पत्र्याचे शेड उभारून सभामंडप उभारण्यात आला होता.
याविषयी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी या मंडळातील सदस्यांना कायदेशीर नोटीस देऊन हे बेकायदेशीर पत्राशेड काढण्याची सूचना दिली होती. मात्र, काही समाजकंटकांनी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निनावी पत्राद्वारे असं कळविले की हे मंदिर हे बेकायदेशीर असून, ते पाडण्यात यावे अशा आशयाचा मजकूर या निनावी पत्रात होता.
मात्र, डोईफोडे यांनी हे प्रकरण संवेदनशील आहे हे ओळखले व पोलिसांना याची पूर्वकल्पना देत व सोशल मीडियावर सुरू असलेल्या चुकीच्या अफवा यामुळे शिर्डीची शांतता कशी भंग पावत आहे हे निदर्शनास आणून दिले. ही पोस्ट नेमकी कोणी? आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केली हे समजण्याच्या आतच शिर्डीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेऊन हे प्रकरण चिघळण्याच्या आतच सर्व गोष्टींचा खुलासा केल्यामुळे सध्या तरी शिर्डीत शांतता आहे.
सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून संपूर्ण जगात ज्या साई मंदिराची ओळख आहे. त्याच साईंच्या शिर्डीत काही समाजकंटकांचा जातीयवादी तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव अखेर उधळून लावण्यास शिर्डी पोलिसांना यश मिळाले असून, अनेक भाविकांनी व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ व त्यांच्या सर्व कर्मचारी वृंदाचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.
सध्या देशात व खास करून महाराष्ट्रात जातीयवादी मतभेद, अफवा यांच पेव फुटले असून, शिर्डीसारख्या पावनभूमीत असे प्रकार घडणे म्हणजेच समाजकंटकाकडून अशांतता माजविणे हेच प्रकरणातून प्रथमदर्शनी दिसून येते. शिर्डी शहरात कोणीही चुकीच्या बातम्या, अफवा, तसेच सोशल मीडियावरील मेसेजेस यावर विश्वास ठेवू नये. तसेच कुणालाही या प्रकरणात कोणतीही माहिती पाहिजे असल्यास अथवा शंका असल्यास थेट नगरपरिषद कार्यालयात संपर्क करावा, असे शिर्डी नगरपरिषदचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे म्हणाले.





