शिंदेंच्या माजी नगरसेवकाला महिला पदाधिकाऱ्याने भर रस्त्यात चोपलं; नेमकं प्रकरण काय?

ठाणे : कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या राणी कपोते यांनी शिवसेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांना भर रस्त्यात कानशिलात लगावली. एक कानशिलात लावून त्यांचा हात काही थांबला नाही, त्या अर्धा तास मोहन उगले यांना मारहाण करत होत्या. आपल्या छातीला हात का लावला? शिव्या का दिल्या? असं म्हणत राणी कपोते यांनी मोहन उगले यांना भर रस्त्यावरच चोप दिल्याची घटना घडली. यावेळी लोकांनी ही बघ्याची भूमिका घेतली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता. हा कार्यक्रम काल सायंकाळी होता. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता. त्याठिकाणी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
त्याठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते पोहचल्या. त्यांनी सांगितले की, या कामाचा पाठपुरावा मी केला आहे. त्यानंतर त्याठिकाणी जोरदार गोंधळ झाला. त्यावर माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा मी केला असल्याचा दावा केला होता. हा राग राणी कपोते यांनी मनात धरून मोहन उगले यांना भर रस्त्यात मारहाण केली.
आपल्या छातीला हात का लावला?
दरम्यान, आपल्या छातीला हात का लावला असे म्हणत राणी कपोते यांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांना चांगलाच चोप दिल्याचे दिसतेय. भर रस्त्यावर त्यांनी मोहन उगले यांना अनेकदा मारहाण केल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. तसेच आपल्याला शिवीगाळ का केली असं म्हणतही त्यांनी मोहन उगले यांना मारहाण केल्याचे दिसतेय. चुकीचा आरोप करत एक महिला आपल्याला कशी मारहाण करते हे सगळ्या लोकांनी पाहावे असे यावेळी मोहन उगले म्हणताना दिसत आहेत. अशातही राणी कपोते या त्यांना मारहाण करताना दिसत आहेत.





