“शिंदे साहेब, सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही..’; अमोल मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत.
विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. अश्यातच आता राष्ट्रवादीचे नेते ‘अमोल मिटकरी’ यांनीही शिंदे सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे. तसेच, या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीच अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
अमोल मिटकरी म्हणाले की, “महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी एवढा खर्च करण्यात आला. पाण्यासारखा पैसा ओतला. मग लोकांसाठी चांगली व्यवस्था का करता आली नाही? केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी चांगली व्हीआयपी व्यवस्था होती. मात्र भक्त संप्रदायाचे सदस्य लाखोंच्या संख्येने येतील हे प्रशासनाला कळलं नाही का? मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख दिले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं आहे. या घटनेचं राजकारण करू नये म्हणून सांगितलं गेलं. राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. पण शिंदे साहेब, एवढी माणसं मरत असतील तर सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही’, असं अमोल मिटकरी म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, या घटनेची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण राज्य सरकारच या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे. सरकारच या कार्यक्रमाचे आयोजक आहे. असं देखील अमोल मिटकरी यावेळी म्हणाले.
नेमकं काय घडलं ?
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित होते. मात्र तळपत्या उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या 123 हून अधिक लोकांना तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.





