मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात या जोडप्याला परदेश प्रवासास मनाई केली आहे. तसेच, या प्रकरणात 60 कोटी रुपये भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा आणि राज यांच्याविरुद्ध जारी केलेली लूकआउट नोटीस अद्याप कायम असून, त्यामुळे त्यांना तपास यंत्रणेच्या किंवा न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाता येणार नाही. कोलंबो प्रवासाला नकार शिल्पा शेट्टीने 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान यूट्यूब कार्यक्रमासाठी कोलंबोला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, तिच्या वकिलांनी केवळ फोनवरून निमंत्रण मिळाल्याचे सांगितल्याने न्यायालयाने निमंत्रण पत्रिकेची मागणी केली. यानंतर, न्यायालयाने शिल्पाच्या परदेश प्रवासाच्या मागणीला तात्काळ फेटाळले आणि फसवणूक प्रकरणात प्रथम 60 कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. यापूर्वीही गेल्या आठवड्यात न्यायालयाने शिल्पा आणि राज यांना थायलंडमधील फुकेत येथे जाण्यास मनाई केली होती.