Shilpa Shetty : अभिनयासोबतच फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा तिच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात शूटिंगच्या वेळी घडलेल्या एका घटनेची आठवण सांगितली. शिल्पाने सांगितले की, एका शूटिंगदरम्यान एचएमआय लाईटमुळे तिच्या पाठीवर भाजले होते. त्या सीनमध्ये तिला फ्रेमच्या बाहेर जायचे होते आणि मागे असलेल्या लाईटमुळे ती भाजली. सुरुवातीला दुखापत जाणवली नाही, पण काही वेळाने जळजळ वाढली. तरीही, दुसऱ्याच दिवशी ती पुन्हा शूटिंगसाठी हजर झाली. त्या दिवशी तिला एक खास ड्रेस घालायचा होता, मात्र भाजल्यामुळे तो परिधान करणे कठीण होते. हे सांगताना शिल्पा म्हणाली, “माझ्यामुळे प्रोडक्शनला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मी नेहमी प्रयत्न केला.” ती पुढे म्हणाली की, परिस्थिती काहीही असो, तिने नेहमीच पूर्ण समर्पणाने काम केले. प्रत्येक संधीला वेळेवर हजर राहणे आणि मेहनतीमुळेच तिला सतत काम मिळत गेले. थोडक्यात शिल्पाने तिची कामाप्रती असलेली भावना व्यक्त केली आहे. शिल्पा शेट्टीने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. तिच्या नावावर अनेक मोठे सिनेमे आहेत. 90 च्या दशकातील ज्या आघाडीच्या अभिनेत्री बॅालिवूडमध्ये होत्या. त्यामध्ये शिल्पा शेट्टीचेही नाव घेतले जाते. शिल्पाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ती इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत झळकली होती. सध्या ती केडी द डेव्हील या सिनेमात असून, अभिनेता संजय दत्त याच्यासोबत महत्वाच्या भूमिकेत आहे. हेही वाचा : Satara News : पालिकेच्या गाळ्यांवर ‘राजकीय’ डाका; कोट्यवधींचा महसूल कोणाच्या खिशात?