Shikrapur Police : शिक्रापूर पोलीस ठाण्याला नवे निरीक्षक; चंद्रशेखर यादव यांनी स्वीकारला पदभार
Shikrapur Police : दीपरत्न गायकवाड यांची जिल्हा विशेष शाखेत बदली

Shikrapur Police : पुणे ग्रामीण पोलीस दलातील प्रशासकीय बदलांतर्गत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांची जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.
चंद्रशेखर यादव यांनी यापूर्वी बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच प्रशासकीय कामकाजात प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या अनुभवाचा शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या कामकाजाला लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर महामार्ग, औद्योगिक क्षेत्र तसेच विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. विजयस्तंभ अभिवादन सोहळा, छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम यांसारख्या मोठ्या आयोजनांमुळे या परिसरात पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त जबाबदारी असते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई आणि नागरिकाभिमुख पोलीसिंग ही आव्हाने यादव यांच्यासमोर असणार आहेत.
दरम्यान, दीपरत्न गायकवाड यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यातील कार्यकाळात विविध गुन्ह्यांचा तपास, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून संवेदनशील घटनांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात यश आले होते.
जिल्हा विशेष शाखा ही पोलीस विभागाची महत्त्वाची गुप्तचर शाखा मानली जाते. कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित माहिती संकलन, संवेदनशील घडामोडींवर लक्ष ठेवणे तसेच विविध कार्यक्रम, आंदोलने आणि इतर घटनांबाबत गुप्त माहिती गोळा करण्याची जबाबदारी या शाखेकडे असते. गायकवाड यांच्याकडे आता या शाखेची धुरा सोपविण्यात आली आहे.
या बदलामुळे शिक्रापूर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांचे लक्ष नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यशैलीकडे लागले असून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





