Shikrapur News: निमगाव दुडे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – निमगाव दुडे (ता. शिरूर) आणि परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने, तसेच काही पशुधनावर हल्ले होत होते. अखेर वनविभागाला लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिरूर वनविभागाच्या वतीने सोपान बवले यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळच्या सुमारास हा बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडळ अधिकारी नितीन म्हात्रे, नियतक्षेत्र वनअधिकारी नारायण राठोड आणि वन्यजीव बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे पाच वर्षे वयाचा नर आहे. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. यावेळी सरपंच अमोल घोडे, सोमनाथ तांबे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.





