Shikrapur News : अपघातांना अधिकारीच जबाबदार! कारवाई होत नसल्याने भाजप नेते संजय पाचंगे आक्रमक, ४ नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – शिक्रापूर-चाकण आणि शिक्रापूर-शिरूर रस्त्यांवर वारंवार अपघात होऊन अनेकांचे जीव गेल्याने, या अपघातांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ४ नोव्हेंबरपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून उपोषण करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन त्यांनी शिक्रापूर पोलिसांना दिले आहे.शिक्रापूर-चाकण आणि शिक्रापूर-शिरूर या दोन्ही रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे हे रस्ते नेहमीच चर्चेत असतात.
जानेवारी २०२५ मध्ये शिक्रापूर-चाकण रस्त्यावर झालेल्या कंटेनरच्या अपघातात एका युवकासह दोन लहान मुलांचा मृत्यू होऊन संपूर्ण कुटुंब संपले होते. पुढे हा कंटेनर चालक दारू प्यायलेला असल्याचे समोर आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू प्रकरणाची चौकशी न केल्यामुळे हे अपघात घडले.
त्यामुळे या अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागासह शासकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत, पाचंगे यांनी जानेवारी २०२५ मध्येच या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने ४ नोव्हेंबरपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून उपोषण करण्याचा निर्णय संजय पाचंगे यांनी जाहीर केला आहे.





