Shikrapur Crime | सणसवाडीत पेट्रोलपंप कामगारावर जीवघेणा हल्ला

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथील ओंकार पेट्रोलपंप येथे दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या युवकांना सिगारेट बाहेर जाऊन प्या, असे म्हटल्याने चौघांनी पेट्रोल पंपच्या दोन कामगारांवर जीवघेणा हल्ला करत कोयत्याने वार केल्याने शिक्रापूर पोलिसात अनिकेत सुनील गायकवाड, दत्ता अशोक सोमवंशी, अरमान मजार खान व प्रसन्ना बडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार पेट्रोलपंपावरील कामगार दयानंद सरोदे व महादेव सरोदे दोघे पेट्रोलपंपवर असताना एमएच १२ एमडब्ल्यू ११९९ या दुचाकीहून दोन युवक मद्यधुंद अवस्थेत हातात पेटवलेली सिगारेट घेऊन आल्याने दयानंद याने येथे पेट्रोल चालू आहे, येथे सिगारेट पेटवून ठेवू नका, असे म्हणत सिगारेट बाजूला केल्याने दोघेजण दमदाटी करत निघून गेले.
मात्र काही वेळाने एमएच १२ एमडब्ल्यू ११९९ व एमएच १२ एसव्ही ३३४७ या दोन दुचाकीहून चौघेजण काठ्या व कोयता घेऊन आले. त्यांनी इंद्रजीत व महादेव यांना शिवीगाळ करत कोयत्याने तोंडावर वार करून जखमी केले. या घटनेत दयानंद इंद्रसेन सरोदे व महादेव इंद्रसेन सरोदे हे दोघे जखमी झाले.
असून याबाबत दयानंद इंद्रसेन सरोदे (वय ३६, रा. सणसवाडी) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी अनिकेत सुनील गायकवाड (रा. वाडागाव ता. शिरूर), दत्ता अशोक सोमवंशी (रा. पेरणे फाटा ता. हवेली), अरमान मजार खान (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर), प्रसन्ना बडे (रा. पेरणे ता. हवेली ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवलदार दामोदर होळकर करत आहेत.




