Shikrapur Crime: मैत्रिणीचा विषय अन् कोयत्याचा थरार; शिक्रापुरात तरुणाला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे मैत्रिणीबाबत नातेवाईकांना काही सांगितल्याच्या गैरसमजातून एका युवकाचा अपघात करून कोयत्याने पाठलाग करत खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मनोज साहेबराव भंडारे याच्यासह चार अनोळखी युवकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप संभाजी भंडारे (वय २८, रा. वढू बुद्रुक) आणि आरोपी मनोज भंडारे यांच्यात मैत्रिणीच्या विषयावरून आधीच वाद झाले होते. प्रदीपने मनोजच्या मैत्रिणीबाबत तिच्या नातेवाईकांना काहीतरी चुकीचे सांगितले असा मनोजचा गैरसमज झाला होता. प्रदीपने आपण असे काहीही सांगितले नसल्याचे स्पष्ट केले होते, तरीही मनोजने त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती.
६ जानेवारी रोजी प्रदीप दुचाकीवरून आपकडे जात असताना, कारमधून आलेल्या मनोजने त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले.दुचाकीवरून खाली पडल्यानंतर मनोजसह इतर चार जणांनी हातात कोयते घेऊन प्रदीपचा पाठलाग सुरू केला. यावेळी संशयित आरोपींनी त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
प्रदीपने जीवाच्या आकांताने पळत जाऊन गावातील एका घरात आश्रय घेतला आणि आपल्या चुलत्यांना तसेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रदीप भंडारे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





