Shikrapur Accident: उसाची कांडी गोळा करताना काळाचा घाला! ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून महिलेचा अंत

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे शेतामध्ये ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून एका ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उषा राम क्षीरसागर असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे जातेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जातेगाव बुद्रुक येथील उषा क्षीरसागर यांच्या शेतात मशीनच्या साहाय्याने ऊसतोड सुरू होती. यावेळी उषा या ट्रॅक्टरच्या पाठीमागे जमिनीवर पडलेली उसाची कांडी गोळा करण्याचे काम करत होत्या. दरम्यान, एम एच १२ वाय एक्स ८५६२ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने अचानक ट्रॅक्टर पाठीमागे घेतला.
यामुळे उषा या खाली पडल्या आणि त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेले. या भीषण अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेबाबत संदीप काळुराम क्षीरसागर (वय ३१, रा. जातेगाव बुद्रुक) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक विकास संजय जाधव (रा. पळशी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बापू हाडगळे करत आहेत.





