Shikhar Dhawan Wedding : ‘गब्बर’ पुन्हा चढणार बोहल्यावर! सोफी शाइनसोबत ‘या महिन्यात बांधणार लग्नगाठ

Shikhar Dhawan Wedding with Sophie Shine : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि ‘गब्बर’ या नावाने प्रसिद्ध असलेला शिखर धवन लवकरच आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू करणार आहे. शिखर धवन येत्या फेब्रुवारी महिन्यात आपली गर्लफ्रेंड सोफी शाइन (Sophie Shine) हिच्याशी लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
फेब्रुवारीत दिल्लीत रंगणार विवाह सोहळा –
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, हा विवाह सोहळा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्ली-NCR मध्ये पार पडणार आहे. हा कार्यक्रम खाजगी असला तरी तो अत्यंत हाय-प्रोफाइल असेल. यामध्ये क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंसह बॉलिवूडमधील अनेक नामवंत सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कशी झाली सोफी आणि शिखरची ओळख?
शिखर आणि सोफी यांची पहिली भेट काही वर्षांपूर्वी दुबईमध्ये झाली होती. तिथून सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान हे दोघे पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र दिसले होते. त्यानंतर मे २०२५ मध्ये त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. सोफी शाइन ही आयर्लंडची रहिवासी असून तिचे आणि शिखरचे वय यात ५ वर्षांचे अंतर आहे (शिखर ४० वर्षे, सोफी ३५ वर्षे).
कोण आहे सोफी शाइन?
View this post on Instagram
सोफी शाइन ही व्यवसायाने प्रोडक्ट कंसल्टंट आहे. ती अमेरिकेतील ‘नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन’ या नामांकित फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीत सेकंड व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे, ती ‘शिखर धवन फाउंडेशन’ची प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहे.
दुसरी इनिंग, नवीन आशा –
शिखर धवनचे पहिले लग्न आयशा मुखर्जीशी झाले होते, परंतु २०२३ मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. त्यांना जोरावर नावाचा ११ वर्षांचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर शिखर बराच काळ एकटा होता आणि अनेकदा मुलाच्या आठवणीत भावूक होताना दिसला. मात्र, आता सोफीच्या रूपाने त्याला नवा जोडीदार मिळाला असून तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील या नवीन वळणाबद्दल अत्यंत उत्साही आहे.
हेही वाचा – Pratika Rawal Controversy : AI चा गैरवापर अन् फोटोंशी छेडछाड! क्रिकेटर प्रतिका संतापली; एआय टूलला दिली ताकीद
‘गब्बर’ची शानदार क्रिकेट कारकीर्द –
शिखर धवनने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे:
- कसोटी: ३४ सामने (२,३१५ धावा)
- वनडे: १६७ सामने (६,७९३ धावा)
- टी-२०: ६८ सामने (१,७५९ धावा)
- एकूण टी-२० (लीगसह): ३३४ सामन्यात ९,७९७ धावा.

