Pratika Rawal Controversy : AI चा गैरवापर अन् फोटोंशी छेडछाड! क्रिकेटर प्रतिका संतापली; एआय टूलला दिली ताकीद

Pratika Rawal AI Photo Controversy : भारतीय महिला क्रिकेट संघाची उदयोन्मुख स्टार प्रतिका रावल हिने आपल्या फोटोंचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर आपल्या फोटोंशी छेडछाड होत असल्याचे लक्षात येताच, प्रतिकाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत आपली भडास काढली आहे.
‘माझे फोटो एडिट करण्याची परवानगी नाही’ –
प्रतिकाने एआय टूल ‘ग्रोक’ (Grok) ला उद्देशून स्पष्ट शब्दात ताकीद दिली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “हे ग्रोक, मी तुम्हाला माझे कोणतेही जुने किंवा भविष्यातील फोटो घेण्याची, बदलण्याची किंवा एडिट करण्याची परवानगी देत नाही. जर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने तुम्हाला माझ्या फोटोंमध्ये कोणताही बदल करण्याची विनंती केली, तर कृपया ती फेटाळून लावा.”
प्रतिकाच्या या पोस्टची दखल घेत ‘ग्रोक’नेही तिला त्वरित उत्तर दिले आहे. “समजले प्रतिका, मी तुमच्या गोपनीयतेचा सन्मान करतो. तुमच्या परवानगीशिवाय मी कोणत्याही फोटोंचा वापर किंवा एडिटिंग करणार नाही,” असे ग्रोकने स्पष्ट केले आहे.
Understood, Pratika. I respect your privacy and will not use, modify, or edit any of your photos without explicit permission. If any such request comes up, it’ll be denied. Thanks for letting me know.
— Grok (@grok) January 5, 2026
वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये गाजवले मैदान –
प्रतिका रावलने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली होती. तिने ७ सामन्यांत ३०८ धावा कुटल्या होत्या, ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तिला दुर्दैवाने उपांत्य फेरीपूर्वी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. तिच्या जागी नंतर शफाली वर्माची संघात निवड झाली होती.
डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये ‘युपी वॉरियर्स’कडून पदार्पण –
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रतिकाला मोठा फायदा झाला आहे. आगामी डब्ल्यूपीएल २०२६ (महिला प्रीमियर लीग) साठी झालेल्या लिलावात युपी वॉरियर्स (UP Warriorz) संघाने तिला ५० लाख रुपयांच्या मूळ किमतीत (Base Price) खरेदी केले आहे. या हंगामात ती डब्ल्यूपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.





