Pune News : भाजप नेते शेखर चरेगावकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी! गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
Pune News : सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना ८ कोटींच्या फसवणूक प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Pune News : पुणे-रिसॉर्ट मॅनेजमेंटच्या व्यवसायातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करत कराडमधील यशवंत सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचा माजी अध्यक्ष व भाजपचा नेता शेखर चरेगावकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणात शेखर सुरेश चरेगावकरसह बुलडाणा येथील चिखली नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष सतीश भगवानदार गुप्ता, संतोष पवार, वनिता पवार, श्रीपदा कुलकर्णी, रोहित लभडे, सुरेंद्र काळे, सुमित घोडके यांच्याविरोधात भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत, प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी न्यायालयात तक्रार दिली होती. त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींविरोधात ५ मार्च २०२४ रोजी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींनी तक्रारदारांना गुंतवणूक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करत त्यापैकी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चरेगावकरला अटक करून न्यायालयात हजर केले.
तक्रारदारांच्या वतीने अॅड. विपुल दुशिंग आणि अॅड. स्वानंद गोविंदवार यांनी बाजू मांडली. दरम्यान, यशवंत बँकेतून ११२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी चरेगावकरला गेल्या वर्षी कराड पोलिसांनी अटक केली होती, तर अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) दाखल कलम काढले असून, याबाबत योग्य तपास व्हावा, असा अर्ज तक्रारदारांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.





