yashwant bank scam : पुणे येथे पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपचे माजी मंत्री शेखर चरेगावकर यांना अटक केली आहे. रिसॉर्ट व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणे आणि सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपांवर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात यशवंत सहकारी बँक मधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. गुंतवणूक योजनेअंतर्गत सुमारे ८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून त्यापैकी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात चिखली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश भगवानदार गुप्ता, संतोष पवार, वनिता पवार, श्रीपदा कुलकर्णी, रोहित लभडे, सुरेंद्र काळे आणि सुमित घोडके यांच्याविरोधातही भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर ५ मार्च २०२४ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चरेगावकर यांना अटक केली. न्यायालयात सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शेखर चरेगावकर यांना याआधीही कराड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर ११२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप असून अंमलबजावणी संचालनालय (ED) कडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसारही कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.