शेख हसीना संकटात! बांगलादेशातील न्यायालयाने बजावले अटक वॉरंट

ढाका – बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने आज माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य काही जणांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले. आवामी लीग पक्षाच्या राजवटीच्या काळात काही व्यक्तींना जबरदस्तीने गायब केल्या गेलेबद्दल मानवतेविरोधातील गुन्ह्यांच्या आरोपाखाली हे अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. न्या. मोहम्मद गुलाम मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाच्या तीन सदस्यीय पिठाने दोन वेगवेगळ्या प्रकरणातील आरोपांची दखल घेतली आणि हे वॉरंट बजावले आहे.
हसीना आणि अन्य २९ जणांच्या देखरेखीखाली राजकीय विरोधकांना ताब्यात घेतले आणि गायब केले. सुरक्षा एजन्सींनी केलेल्या कारवाईमध्ये या सर्वांना गोपनीय ठिकाणी डांबण्यात आले, असे आरोप आहेत. यातील पहिल्या प्रकरणात हसीना आणि त्यांचे माजी सुरक्षा आणि संरक्षण सल्लागार तारिक अहमद सिद्दीकी यांच्यासह १३ व्यक्तींविरोधात ५ आरोप आहेत.
त्यांच्यावर सुरक्षा दल गुप्तचरांच्या महासंचलनालयातील चौकशी कक्षामध्ये केलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तर दुसरा आरोप रॅपिड ऍक्शन बटालियनच्या टास्क फोर्सच्या चौकशी कक्षातील अत्याचारांबाबत हसीना, सिद्दीकी आणि अन्य १५ जणांविरोधात आहे. याशिवाय मानवतेविरोधातील गुन्ह्यांचेही आरोप संबंधितांविरोधात आहे.
हसीना आणि अन्य संबंधितांविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले असून त्यांना २२ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गेल्या वर्षी आवामी लीग सरकारविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करून भारतात आश्रय घेतला आहे.





