शेगाव संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1.11 कोटींची मदत; पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनेही दिला एक कोटीचा हात

बुलढाणा/पंढरपूर : राज्यात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातलेल्या पूरग्रस्तांसाठी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानने 1 कोटी 11 लाख रुपयांची भरीव मदत जाहीर केली आहे. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. त्याचबरोबर पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी रुपये आणि पूरग्रस्तांना श्रींच्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील पूरस्थितीने शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेती खरडून गेली, पिकांचा सत्यानाश झाला, तर अनेक ठिकाणी घरांची पडझड आणि जनावरांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील खर्चही निघण्याची शक्यता धूसर झाली आहे. या संकटकाळात शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
शेगाव संस्थानची सामाजिक बांधिलकी –
संकटकाळात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानने यंदाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1 कोटी 11 लाख रुपयांचा सहयोग दिला. यापूर्वी 2019 मध्येही अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी संस्थानने असाच 1 कोटी 11 लाखांचा धनादेश दिला होता. या भरीव मदतीद्वारे संस्थानने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा सिद्ध केली आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा पुढाकार –
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंदिर समितीने 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय, पूरग्रस्तांना श्रींच्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ही मदत देण्यात येत आहे.
राज्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शेगाव आणि पंढरपूरसह अनेक देवस्थानांनी पुढे येऊन केलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





