Junnar News : जुन्नरमधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ६१ गावांचे पंचनामे पूर्ण; मदतीचा आकडा आला समोर
Junnar News : जुन्नर तालुक्यातील ६१ गावांमध्ये अवकाळी पाऊसामुळे पिकांचे कोट्यवधींचे नुकसान; महसूल व कृषी विभागातर्फे मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर.

Junnar News – जुन्नर परिसरासह संपूर्ण तालुक्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपीठामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या ६१ गावांमधील ३६११ शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ३ कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
तहसील कार्यालय, तालुका कृषी विभाग आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यात एकूण १९१७ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने केळी, आंबा, चिकू, डाळिंब या फळबागांसह कांदा, भाजीपाला, गहू आणि बाजरी यांसारख्या नगदी पिकांना गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे.
तालुक्यातील शिरोली, तेजेवाडी, निमदरी, वडगाव सहानी, आर्वी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, धामणखेल, निमगाव म्हाळुंगे, निरगुडे, कुसुर, येणेरे, खानगाव, कुमशेत, अलदरे, पारगाव आळे यांसह ६१ गावांच्या नुकसानीचा समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे. शासनाकडून हा मदत निधी मंजूर झाल्यानंतर तो थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या बळीराजाला या सरकारी मदतीमुळे मोठा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून, शासनाने ही मदत लवकरात लवकर वितरित करावी, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.





