“कामरा आणि त्याच्या आकाला भांगडा करायला लागणार”; शीतल म्हात्रेचा थेट इशारा

मुंबई : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
हा तोच भामटा कुणाल कामरा
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी कुणाल कामरा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा हा तोच भामटा कुणाल कामरा… बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामराने एकनाथ शिंदे साहेबांची माफी मागावी, नाहीतर हा असंगाशी संग करणाऱ्या कामराला आणि त्याच्या “आका”ला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार हे नक्की” असा थेट इशारा शीतल म्हात्रे यांनी दिला आहे.
कामरा तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही : नरेश म्हस्के
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह गाणे आणि विधान केल्याप्रकरणी आता पडसद उमटू लागले आहेत. कामरा याच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत असून नरेश म्हस्के यांनी तर कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे.
क्लबची तोडफोड
प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने एक विडंबनात्मक गाणं बनवून एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या हॉटेलची तोडफोड केली आहे.
काय म्हणाले होते कुणाल कामरा?
शिवसेना भाजप पक्षामधून बाहेर आली. पुढे शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. त्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. एका मतदाराला ९ बटन दिले. यामुळे सर्व संभ्रमात पडले. एकाने पक्ष चालू केला होता. ते खूप मोठा जिल्हा ठाणे, तिथून येतात, असा टोला कुणालने कवितेतून लगावला आहे. यांचे हे राजकारण आहे. त्यांना घराणेशाही संपवायची होती. त्यामुळे कुणाचा बाप चोरून घेतला.
आता काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का, त्याला सांगतो चल भाई जेवण करुयात. त्याच्या वडिलांचे कौतुक करतो आणि सांगतो, भाई तुझा बाप आजपासून माझा बाप, असा मिश्किल टोला कामराने लगावला. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. कुणाल कामराच्या कवितेनंतर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.



