Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटावर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) गंभीर आरोप केले आहेत. म्हस्के यांनी दावा केला की, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने प्रारंभी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय (Rajya Sabha Election) घेतला नव्हता, मात्र एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच घाबरून त्यांनी पवार यांना पाठिंबा जाहीर केला. म्हस्के यांनी सांगितले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सन्मान राखणे हे आमचे कर्तव्य आहे. खासदार सुप्रिया सुळे आदल्या दिवशी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या होत्या. त्या बाहेर पडत नाहीत, तोच आदित्य ठाकरेंचे ट्विट आले की, “आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही आमचा उमेदवार उभा करणार.” याचा अर्थ असा की, आदित्या ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरद पवार यांना पाठिंबा देणार नव्हते. हा निर्णय आदल्या रात्रीच झाला होता. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी आठवा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असून, ते आपल्या मतांवर ठाम आहेत, हे जेव्हा ठाकरेंना कळले, तेव्हा घाबरून त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला, असा दावा म्हस्के यांनी केला. ते म्हणाले, “ठाकरेंच्या शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा केला असता तर तो पडला असता, ही शंभर टक्के गॅरंटी होती. म्हणून त्यांनी पवारसाहेबांना पाठिंबा देण्याचे नाटक केले. अन्यथा त्यांचा शरद पवार यांच्या उमेदवारीला विरोध होता. पण, शरद पवार हे राज्यातील नव्हे तर देशातील सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा आदर राखणे आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांनीच हा आदर राखला आहे.” म्हस्के यांनी पुढे म्हटले की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना “कोणी आमदारकी देता का आमदारकी” अशी विनवणी महाविकास आघाडीतील पक्षांकडे केली आहे. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. “आमची अतिरिक्त मते त्यांना हवी असतील तर एकनाथ शिंदे यांना एक फोन करावा. विनंती करा असं आम्ही म्हणणार नाही, पण किमान संवाद साधा,” असे आवाहन म्हस्के यांनी केले. राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला होता. “त्याच पद्धतीने तुम्हीही संवाद साधा. आमचे साहेब (एकनाथ शिंदे) मोठ्या मनाचे आहेत. पण त्यासाठी किमान बोलायला तरी पाहिजे,” असे म्हस्के म्हणाले. म्हस्के यांच्या या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण झाले आहे.