अचानक मिळालेल्या प्रसिध्दीचा तिला बसला फटका…; १० दिवसांत १० कोटी कमावल्याच्या बातम्या खोट्या

खरगोन – प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये माळा विकणारी ‘मोनालिसा’ ही मुलगी एका रात्रीत स्टार बनली. सोशल मीडियावर गेले काही दिवस तिचीच चर्चा होते आहे. काही व्हिडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की मोनालिसाने १० दिवसांत १० कोटी रुपये कमावले आहेत. ती महेश्वर येथील तिच्या घरी परतली आहे.
तिला चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत ही गोष्ट जरी खरी असली तरी तिने १० दिवसांत १० कोटी रुपये कमावल्याचे दावे खोटे असल्याचे मोनालिसाने स्वत: म्हटले आहे. उलट या प्रसिद्धीमुळे त्यांचा व्यवसाय बुडाला आणि महाकुंभानंतर त्यांना प्रयागराजला परतावे लागले अशी खंतही तिने व्यक्त केली.
महाकुंभातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, लोक तिच्यासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त होते, त्यामुळे माळांची विक्री कमी झाली. तिला ३५,००० रुपये कर्जही घ्यावे लागले. लोकांनी त्रास दिला, ज्यामुळे तिची सुरक्षितता धोक्यात आली असे तिने म्हटल्याचे एका संकेतस्थळावरील बातमीत म्हटले आहे.
ती म्हणाली की जर मी इतके पैसे कमवले असते तर मी इथे राहून हार का विकले असते? तथापि, मोनालिसाच्या प्रसिद्धीमुळे तिच्या व्यवसायाला चालना मिळण्याऐवजी नुकसानच झाले. या नवीन प्रसिद्धीसोबत इंदूरच्या या मुलीसाठी अनेक आव्हानेही निर्माण झाली आहेत. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये मोनालिसाच्या वडिलांनी म्हटले आहे की त्यांच्या मुलीच्या अचानक प्रसिद्धीचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
मोनालिसा अचानक प्रसिध्दीच्या झोतात आल्यामुळे सामान्य लोकांपासून ते युट्यूबर्सपर्यंत, सर्वांना तिच्यासोबत फोटो काढायचा होता किंवा तिची मुलाखत घ्यायची होती. या गोंधळामुळे महाकुंभात अशा अनेक घटना घडल्या, जिथे मोनालिसाला त्रासालाच सामोरे जावे लागले. तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त होऊ लागल्या. एक्सवरील अनेक व्हिडिओंमध्ये, लोक तिचा पाठलाग करताना दिसत होते.





