Shashikant Shinde : पवार साहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण होणार? मतदानानंतर आ. शशिकांत शिंदेंचा मोठा दावा
Shashikant Shinde : अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट; यशवंत विचारांचा महाराष्ट्र परिवर्तनासाठी सज्ज असल्याचा प्रदेशाध्यक्षांचा दावा.

Shashikant Shinde – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात चांगले यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सध्या निवडणुकीची रणनीती बदललेली असून, विशेषतः शेवटच्या दोन दिवसात सत्तारूढ पक्षाकडून वापरल्या जाणार्या दबावतंत्राला जनता आता ओळखू लागली आहे.
त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी जनतेची मानसिकता ठामपणे उभी राहत असल्याचे त्यांनी सांगितले.ल्हासुर्णे येथे शनिवारी सकाळी आ. शिंदे यांनी पत्नी वैशालीताई शिंदे व मुलगा साहिल शिंदे यांच्यासमवेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
आ. शिंदे पुढे म्हणाले की, अजितदादा पवार व पवार साहेबांचे स्वप्न हे कधीही विभाजन न करता एकत्रितपणे लढण्याचे होते. त्या भूमिकेचा निश्चितच फायदा या निवडणुकीत होईल. सभांदरम्यान लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असून, मनातून लोक बदलाची इच्छा व्यक्त करत आहेत. हीच इच्छा प्रत्यक्ष मतदानातून दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीतील शेवटच्या दोन दिवसांच्या रणनीतीबाबत बोलताना आ. शिंदे म्हणाले की, सत्तेचा प्रचंड दबाव कार्यकर्त्यांवर टाकला जातो. विकासकामे थांबवण्याच्या धमक्या दिल्या जातात, आम्ही बघून घेऊ, अशा वल्गना केल्या जातात. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असून, मुक्त व निर्भय वातावरणात मतदान होणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, महाराष्ट्र हा यशवंत विचारांचा आहे. एखादे नेतृत्व अचानक आपल्यातून निघून गेले, तर महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना निर्माण होते. पक्षभेद बाजूला ठेवून लोक चौकाचौकात उभे राहिले, फ्लेक्स लावले. ही सहानुभूती निश्चितच अजितदादांबद्दल असून, त्याचा निवडणुकीत सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.






