Satara Lok Sabha Election 2024| सातारा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित असून आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १५) आ. शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून यावेळी साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
सातारा लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती कारणास्तव लढण्यास नकार दिल्यानंतर आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसमधून (शरद पवार गट) पुढे आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज घोषणा झाल्यावर दि. १५ रोजी शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आ. शशिकांत शिंदे महाविकास आघाडीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन व सभा होणार आहे.
मोहिते पाटील यांचा अर्ज मंगळवारी दाखल होणार Satara Lok Sabha Election 2024|
माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीतील आ. रामराजे ना. निंबाळकर व विजयसिंह मोहिते पाटील यांनी विरोध दर्शवल्याने माढ्यात महायुतीत संघर्ष वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून (शरद पवार गट) धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर त्यांच्या उमेदवारीचीही पक्षाकडून घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. १६) सोलापूर येथे धैर्यशील मोहिते – पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.
हेही वाचा:
असदुद्दीन ओवेसींच्या विरोधात लढणाऱ्या भाजपच्या महिला उमेदवाराला Y+ सुरक्षा; कोण आहेत माधवी लता?