परराष्ट्र विषयक समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नियुक्ती

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना परराष्ट्र विषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तर, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह शिक्षण विषयक समितीची धुरा सांभाळतील. कॉंग्रेसला कृषी आणि ग्रामविकास विषयक स्थायी समित्यांचेही अध्यक्षपद मिळाले आहे.
त्यानुसार, पक्षाने कृषी विषयक समितीची धुरा पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे सोपवली. तर, ग्रामविकास समितीचे नेतृत्व ओडिशातील खासदार सप्तगिरी उलाका करतील. संसदीय स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. प्रामुख्याने परराष्ट्र, संरक्षण, अर्थ आणि गृह समित्यांच्या नियंत्रणावरून सरकार आणि विरोधकांच्या स्तरांवरून जोरदार बार्गेनिंग झाले.
कॉंग्रेसच्या वतीने त्या चर्चेत जयराम रमेश आणि गौरव गोगोई हे नेते सहभागी झाले. दोन्ही बाजूंमधील सहमतीनंतर कॉंग्रेसला ४ समित्यांचे अध्यक्षपद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. त्या पक्षाला ५ वर्षांच्या खंडानंतर परराष्ट्र विषयक समितीचे अध्यक्षपद मिळाले. याआधी २०१४ ते २०१९ या कालावधीत थरूर हेच त्या समितीचे अध्यक्ष होते. विधेयके आणण्यासाठी आणि विविध मुद्द्यांवर धोरणे बनवण्यासाठी सरकारला त्या समित्या शिफारसी करू शकतात. तसेच, विधेयकांची छाननीही करू शकतात. त्यामुळे त्या समित्यांना मोठे महत्व आहे.





