शशी थरूर यांनी स्वीकारली कॉंग्रेसपेक्षा वेगळी भूमिका; मोदी-ट्रम्प चर्चेची पुन्हा प्रशंसा

थिरूवनंतरपूरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेची कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पुन्हा प्रशंसा केली. त्यामुळे त्या चर्चेबाबत थरूर यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका स्वीकारल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले. मोदी-ट्रम्प चर्चेत उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित अमेरिकेतील भ्रष्टाचार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित झाला नाही.
त्यावरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. अदानी यांच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत, असे ते म्हणाले. तर, कॉंग्रेसचे आणखी एक नेते रणदीप सुरजेवाला यांनी अमेरिकेकडून मिळणाऱ्या एफ-३५ या महागड्या लढाऊ विमानांची भारताला गरज आहे का, असा सवाल केला. त्यावरून त्यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली.
मात्र, मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरून कॉंग्रेसकडून होणाऱ्या टीकासत्राऐवजी प्रशंसेची भूमिका थरूर यांनी स्वीकारली आहे. त्यांनी शुक्रवारी मोदींच्या दौऱ्यातून अपेक्षित बरेच काही मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्या प्रशंसेचे जोरदार समर्थन थरूर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. देशहिताची भावना मनात ठेऊन मी बोलत आहे. नेहमी केवळ पक्षहित विचारात घेऊन बोलता येऊ शकत नाही. भारतीयांच्या दृष्टीने मोदींच्या दौऱ्यातून काही सकारात्मक परिणाम घडले आहेत.





