Sharmila Shinde : “… मग दिवाळीत फोडलेल्या बॉम्बच्या आवाजाचा आनंद लोकांना कसा काय वाटतो?” मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
Sharmila Shinde : ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या जनजागृती मोहिमेदरम्यान अभिनेत्रीने व्यक्त केली भावना

Sharmila Shinde : मुंबई महानगरपालिकेच्या फटाके आणि ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या जनजागृती मोहिमेनंतर फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचदरम्यान, मराठी अभिनेत्री शर्मिला शिंदेने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
शर्मिला शिंदेने पोस्टमध्ये लिहिले की, “आपल्या आयुष्यातले मोठे किंवा महत्त्वाचे निर्णय आपण अपेक्षेप्रमाणे मोठेपणी किंवा Mature झाल्यावर घेतो. पण फटाके फोडायचे नाही हा निर्णय मी खूप लहान असतानाच घेतला होता आणि आजतागायत तो पाळला आहे. ज्या वयात मुलांना धड चांगलं वाईट कळत नसतं, प्रदूषण म्हणजे काय हे सुद्धा पूर्णपणे समजत नसतं अशा वयात मी फटाके वाजवणं बंद केलं.
View this post on Instagram
माझ्या वयाची मुलं फटाक्यांसाठी हट्ट करायची आणि मी स्वैच्छेने त्यांच्यापासून दूर होते, आणि माझ्या या निर्णयात माझ्या आई वडिलांचं काहीच योगदान नव्हतं. मला एवढच माहीत होत की याने प्रदूषण होतं, कचरा होतो, आवाज होतो आणि माझ्या आई वडिलांचे पैसे वाया जातात. त्या वेळी माझ्या बालमनात जो निरागस विचार यायचा तो तुम्हाला सांगते.”
“माझ्या पप्पांना बातम्या बघायची पहिल्यापासूनच खूप आवड. जेव्हा-जेव्हा टीव्हीवर एखाद्या बॉम्ब ब्लास्टची बातमी यायची तेव्हा मला वाटायचं की, अतिरेकी जेव्हा बॉम्ब टाकतात तेव्हा तो आवाज माणसांना कधीच आनंददायी वाटत नाही. मग, दिवाळीत फोडलेल्या बॉम्बच्या आवाजाचा आनंद लोकांना कसा काय वाटतो? आणि आवाजावरती प्रेम असेल तर तो आवाज रेकॉर्ड करून हेडफोनवर ऐकत का बसत नाहीत?
त्या आवाजापायी पृथ्वी, स्वास्थ्य आणि लक्ष्मीचं नुकसान का? आमच्या पुण्यातल्या जुन्या घरी माझ्या वयाची मुलं फटाके फोडत असताना खिडक्या लाऊन बेडच्या कोपऱ्यात बसलेली मी मला आजही आठवते,” असे म्हणत शर्मिलाने दिवाळीबाबतच्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. दरम्यान तिच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
शर्मिला शिंदेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत निकिता हे पात्र साकारत आहे.
हेही वाचा:





