Pune : शरीर-मनाचे संतुलन बिघडले की आयुष्यात अशांतता : शकुंतला दीदी
Pune : शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणे आवश्यक आहे. संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होते, असे शकुंतला दीदी यांनी सांगितले.

Pune : शरीर आणि मनाचे संतुलन राखल्यास निरोगी व दीर्घ आयुष्य जगता येते. मात्र, हे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होते आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन कसे राखावे, याचे मार्गदर्शन ‘कर्मेंद्रिया : शरीर, मन और आत्मा का संतुलित विज्ञान’ या पुस्तकातून मिळेल, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिरूर केंद्राच्या संचालिका राजयोगिनी शकुंतला दीदी यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिवाजीनगर केंद्रातर्फे रमेश खाडे लिखित या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (१ नोव्हेंबर) राजयोगिनी शकुंतला दीदी यांच्या हस्ते झाले. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. टायनी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम जाधव, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, डॉ. राम खर्चे आणि शारदा दीदी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
पुस्तक लेखनाबाबत रमेश खाडे म्हणाले की, आज अनेकांनी स्वतःशी संवाद साधणे कमी केले आहे. स्वसंवाद वाढवून मानसिक संतुलन राखता यावे, यासाठी या पुस्तकातून प्रयत्न केला आहे. अॅड. प्रमोद आडकर यांनी पुस्तकातून जीवनमूल्ये सोप्या भाषेत मांडण्यात आल्याचे सांगितले. बोधकथांच्या माध्यमातून जीवनाचा अर्थ समजून घेता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
सचिन आपटे म्हणाले, संस्कारांची जपणूक आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहिल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. जशी बँक देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देते, तसे हे पुस्तक माणसाच्या नैतिक आणि आत्मिक प्रगतीला बळ देईल. शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधला नाही, तर आयुष्याचा ताळमेळ बिघडतो. हा समतोल साधण्याची दिशा ‘कर्मेंद्रिया’ हे पुस्तक दाखवते.
शांताराम जाधव यांनी चांगल्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढण्याची गरज व्यक्त केली. डॉ. राम खर्चे यांनी वयाच्या ८०व्या वर्षीही ब्रह्माकुमारी ट्रस्टच्या कार्यात सक्रियपणे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शारदा दीदी यांनी सूत्रसंचालन केले.





