Sharif Osman Hadi – इन्कलाब मंचचा प्रवक्ता शरीफ उस्मान हादी याचे दोन संशयित मारेकरी बांगलादेशातून पळून गेले असून ते भारतात असल्याचा संशय ढाका महानगर पोलिसांनी शनिवारी व्यक्त केला. हादी याला १२ डिसेंबर रोजी निवडणूक प्रचारादरम्यान डोक्यात गोळी मारण्यात आली होती. त्याला उपचारांसाठी सिंगापूरला हलवण्यात आले होते. पण १८ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. तेंव्हापासून त्याच्या मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. संशयित मारेकरी असलेले फैसल करीम मसूद आणि आलमगीर शेख हे स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने भारतातील मेघालय राज्यात घुसल्याचे ढाका महानर पोलिसांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त एस एन मोहम्मद नजरुल इस्लाम टी. यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. हलुआघाट सीमेवरून संशयितांनी भारतात प्रवेश केला. सीमा ओलांडल्यानंतर पूर्ती नावाच्या व्यक्तीने त्यांचे स्वागत केले. नंतर सामी नावाच्या टॅक्सी चालकाने त्यांना मेघालयातील तुरा शहरात नेले, असे इस्लाम यांनी सांगितले. मात्र हे दोन्ही संशयित मारेकरी भारतात कधी गेले हे मात्र त्यांनी सांगितले नाही. हादीचे मारेकरी भारतात गेल्याच्या दाव्यावर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.