Share Trading Scam | जास्त परताव्याचं आमिष ; शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली केली ४१ लाखांची फसवणूक!

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – एका अज्ञात व्यक्तीने शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची ४१ लाखांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २५ एप्रिल ते २६ जून दरम्यान बाणेर येथील फ्रेसिआय अपार्टमेंटमध्ये घडली.राजेशकुमार दास (वय ४५, रा. बाणेर, पुणे) यांनी गुरुवारी (दि. १८) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना ‘रीतिका’ नावाच्या एका अज्ञात महिलेने व्हॉट्सॲपवर शेअर ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यासाठी एक लिंक पाठवली.
फिर्यादीने लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर ‘रीतिका’ आणि ‘रघू तिवारी’ यांनी मिळून ‘ट्रेडिंग ५४५५’ नावाचा एक टेलिग्राम ग्रुप तयार केला आणि फिर्यादीला यूएसडीटीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादीकडून एकूण ४१ लाख १९ हजार ४१४ रुपये जमा करण्यास लावले, पण कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम दिली नाही. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




