अग्रलेख: एक पक्ष, दोन मिळावे!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या वतीने आज मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात मेळावे झाले. अजित पवार यांच्या पक्षाचा मेळावा बालेवाडी स्टेडियमवर झाला, तर शरद पवार यांच्या पक्षाचा मेळावा बालगंधर्व रंग मंदिरात झाला. या दोन्ही पक्षांचे नाव आणि चिन्ह वेगवेगळी असली तरी दोन्ही पक्षांनी आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असा दावा कायम ठेवल्याने 26 वर्षांपूर्वी ज्या दिवशी काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती नेमका तोच दिवस दोन्ही पक्षाने आज आपला वर्धापन दिन म्हणून साजरा केला. दोन्हीकडे जोरदार भाषणबाजी झाली, परंतु त्यांनी एकमेकांवर थेट टीका करण्याचे टाळले. आज ना उद्या हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा अजूनही कायम आहे.
मध्यंतरी शरद पवार यांनी त्याविषयीचे सुतोवाच केले होते आणि नंतरही त्याला दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी आपापल्या परीने दुजोरा देत या एकत्रीकरणाच्या बाजूने आपला कौल दिला आहे. या एकत्रीकरणाचा प्रस्ताव अजित पवार गटाकडून मान्य होताना दिसत नाही. असे एकत्रीकरण शक्य नसल्याचेही संकेत अजित पवार गटाने याआधी दिले आहेत. आजही सुनील तटकरे यांनी याविषयी माध्यमांशी बोलताना, आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे उत्तर देऊन या एकत्रीकरणाच्या वावड्या थांबवण्याचा प्रयत्न केलेला दिसला. दुसरीकडे शरद पवार गटाकडून मात्र असे एकत्रीकरण होणारच नाही असे ठामपणे स्पष्ट केले गेलेले नाही.
सुप्रिया सुळे यांना याविषयी पत्रकार नेहमी प्रश्न विचारत असतात. पण त्याही काही थांगपत्ता लागू देत नाहीत. ‘मी बाहेर होते, मी दौर्यावर होते, माझ्यापर्यंत अजून काहीच आलेले नाही, पवार साहेबांबरोबर माझी अजून बोलणे झालेले नाही’, अशी उत्तरे याबाबतीत त्यांच्याकडून दिली जातात. पण एकत्रीकरण व्हावे की नाही याविषयी त्या स्वतःचे मत अजिबात व्यक्त करत नाहीत. त्यांचा सारा रागरंग मात्र या एकत्रीकरणाला विरोध असल्याचा दिसत नाही. दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही आज या एकत्रीकरणावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील नेतेच अजित पवारांबरोबर जुळून घेण्याच्या अगतिकतेत दिसत आहेत. शरद पवार पक्षाला स्वतंत्र अस्तित्व राखणे आता दिवसेंदिवस जिकेरीचे होत चालल्याचे त्यातून जाणवते आहे. कारण या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनाही कायम सत्तेचीच सवय राहिली आहे. सत्तेबाहेर राहून कडवा संघर्ष करणे हा मार्ग त्यांना आता असह्य होताना दिसतो आहे. म्हणूनच शरद पवार पक्षाचे आमदारही, चला आपण अजितदादांबरोबरच जाऊ असा आग्रह धरताना दिसतात. या मूळ पक्षाचे संस्थापक शरद पवार मात्र राजकीय निर्णय प्रक्रियेतून आपण सध्या दूर झालो आहोत असा सूर आळवताना दिसतात.
सर्व निर्णय सुप्रिया पवार आणि पक्षाचे बाकीचे अन्य नेते घेतील असे ते सूचित करत असतात. पण काहीही झाले तरी आपल्या पक्षाचे अस्तित्व कायमच राहील आणि आम्ही भाजपबरोबर कदापिही जाणार नाही असे त्यांच्यापैकी कोणीही ठामपणे सांगत नाही. आज अजित पवारांचा जो पक्ष भाजपबरोबर गेला आहे, तो मोठ्या साहेबांच्या संमतीतूनच गेला आहे असे मानणारे अनेक जण आजही या दोन्ही पक्षात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांविषयी जी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे ती शक्य तितक्या लवकर दूर झाली तर कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थताही संपेल.
आज शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना, उद्या पक्षाचे नेते नेमका काय निर्णय घेतील याची ठाम कल्पना नसल्याने जाहीर प्रचार सभांमध्ये आपण महायुती सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायची की अजून अधांतरीच चाचपडत राहायचे या संभ्रमाच्या अवस्थेत ते आहेत. सतत सत्तेच्या सावलीत वावरत राहिलेल्या लोकांना विरोधी पक्षात राहून कडवा संघर्ष करणे किती जड जात असते ते या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडे पाहून लक्षात येते. या देशात कितीतरी असे राजकीय पक्ष आहेत की ज्यांना कधीच सत्तेची सावली मिळालेली नाही, पण तरीही त्यांनी आपली विचारधारा आणि संघर्ष सोडलेला नाही.
सतत सत्तेसाठी तडजोडी करणे आणि हे करत असताना आपण जनतेच्या हितासाठीच हे करीत आहोत असे भासवणे ही एक प्रकारची बनवेगिरीच असते. मात्र सत्तेची सावली प्राप्त करण्याची किमया राष्ट्रवादीने कायमच केली आहे हे राज्यातील जनतेने वेळोवेळी पाहिले आहे. अजित पवार यांनीही भाजपबरोबर जाण्यासाठी जी तडजोड केली ती अनेकांना आजही पटलेली नाही. मुळात त्यांचा पहाटेचा तो शपथविधी अजूनही अनेकांच्या लक्षात आहे.
महाविकास आघाडी सोडून रातोरात भाजपबरोबर गेलेल्या अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री पद दिले गेल्याने मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसानच झाले आहे, त्यामुळे आता पुन्हा त्यांच्याबरोबरच एकत्र जाणे हे आपल्यासाठी सन्मानाचे असणार नाही अशी खूणगाठ शरद पवार यांच्या समर्थकांनी मनाशी बांधायला हवी.





