Sunil Tatkare : शरद पवारांंचा विलीनकरणाचा गौप्यस्फोट; सुनील तटकरेंची एकाच वाक्यात प्रतिक्रिया
Sunil Tatkare : शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या विधानानंतर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sunil Tatkare : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पोकळी निर्माण झाली असून, उपमुख्यमंत्री पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होणार आहेत. यामुळे मोठ्या घडामोडी मुंबईत सुरू आहेत.
तर दुसरीकडे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे विधान केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत संवाद न साधताच सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य केले. गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. १२ तारखेला घोषणा करण्यात येणार होती, मात्र ही दुर्देवी घटना घडल्याचे शरद पवार म्हणाले. यानंतर याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु होती, त्या बद्दल काय सांगाल? त्यावर सुनील तटकरे म्हणाले की, “मला या विषयावर आता काही बोलायचं नाही. आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. या विषयावर नंतर बोलता येईल” अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
तसेच शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची कल्पना नसल्याचे विधान केले. यावर बोलताना सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “एकतर विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जो काही निर्णय होईल, तो पक्षाचे वरिष्ठ नेते या नात्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवू” असे तटकरे म्हणाले आहेत.
आज सायंकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत. दुपारी २ वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते पदी निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार यांच्याकडील अर्थ खाते वगळता राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खाते सुनेत्रा पवार यांना दिले जाऊ शकते. तर अर्थ आणि वित्त खाते भाजप स्वतःकडे ठेवणार असून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते पुन्हा सुनेत्रा पवारांना दिले जाऊ शकते.
हेही वाचा : Yugendra Pawar Post : “प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत,…”; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत





